Monday, May 13, 2019

1 कांदेपोहे

कांदेपोहे

"
बरे झालेत का पोहे ? " मुलाच्या आईनं विचारलं .
"
हंsss बरे आहेत , थोडं मीठ चाललं असतं " मुलगी उत्तरली .
कोणाला हा अगोचरपणा वाटेल पण अगोचरपणा नसून सहज संवाद होता तो .
आणि पुढे गप्पाच गप्पा . दाखवण्याचा कार्यक्रम ,
म्हणजे ....आम्ही मुलगा बघायला गेलो . मुलाच्या आईने कांदेपोहे केले होते . ईथूनच गोष्टीतलं वेगळेपण सुरू झालेलं लक्षात येईल. ;)
तर , मुलगा एकुलता एक , दिसायला बराबीरा , देशाच्या बँकर्स बँकेत नोकरी म्हंटल्यावर अर्धी लढाई जिंकला होता . बाकी उरली अर्धी .
मुलाशी बोलणं झालं . गप्पांचे विषय , सेन्स ऑफ ह्युमर , बोलण्यातील मोकळेपणा , सहजता जुळत होते , पुढची पाव लढाई जमली .
दाखवणं बघणं वगैरे नसून खूप जुन्या दोस्तांची मैफल असावी असा माहोल .
दिवा स्टेशनला गुड्स ट्रेनचं झालेलं डिरेलमेंट ( 24 Dec 1985 ), बँकेच्या गमतीजमती , चालू विषय , थोडं गाणं , किंचीत पशुपक्षी . काय नी बाय . हसण्याचे धबधबे आणि मोकळा संवाद .
मुलाच्या घरात पुस्तकं दिसत होती आणि लाकडी कॉट ( होय तेव्हा लाकडी कॉट असत जे बाहेरच्या खोलीत ठेवलेले असत आणि दिवसा पाव्हणे बसायला आणि रात्री मालक झोपायला वापरत असत  :D ) तर लाकडी कॉट खाली दिसली वापरात असल्याची ग्वाही देणारी हार्मोनियम  (Y) . न बोलता खूप संवाद होऊन गेला .
पप्पू पूर्ण पास झाला होता . नुसतं पास नाही डिस्टिंगशन सकट .
आता तेहतीस वर्ष झाली कि या गोष्टीला .मिळवलेल्या डिस्टिंगशनला जागत , पुढे त्यात भरच टाकत गाडी पुढे निघाली .
तर तेहेतीस वर्षांपूर्वी .
"
बरं मग निघतो आम्ही , कळवूच काय ते "
"
ओके अच्छा "
मुलगी , तिची आई आणि भाऊ जिना उतरून गेले .
मुलगा आणि त्याची आई बाल्कनीत बाय करायला . ( हे बाल्कनीतून/खिडकीतून बाय प्रकरण तेव्हापासून आजवरचं ) . तर मुलाची आई म्हणाली " केस छान आहेत बघ तिचे . "
एवढा वेळ मुलाच्या लक्षातच आलं नव्हतं .( बऱ्याच गोष्टी कोणीतरी दाखवल्यावरच लक्षात येण्याचं हे प्रकरण सुद्धा तेव्हापासूनचंच ) " अरे हो , खरंच कि , मस्तच आहेत " आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मस्त खुशमिजाज हसू पसरलं .
दुसरा दिवस . मुलगा मुलीच्या थेट ऑफिसात . मुलगी ब्लॅक चुडीदार अँड सिम्पल व्हाईट कुर्ता गळ्याभोवती सहज लपेटलेला दुपट्टा , वय एकवीस फक्त . नो मेकअप . लांबसडक शेपटा बस्स .
मुलाला असं अचानक आलेलं बघून मुलगी गडबडलेली .
मुलगा " मग ...... काय ठरलं तुमचं ? आमचा तर पक्का होकार आहे "
मुलीच्या ऑफिसमधले सहकारी मिश्किल .......' हंsss ' वाल्या मूडमध्ये .
"
आईला विचारून सांगते " उफ्फ . कांदेपोह्यांच्या दिवशी पोह्यात मीठ थोडं चाललं असतं म्हणणारी मुलगी आणि हे असं गुळमुळीत उत्तर . हंss , होतं असंही होतं .
आणि ठरलं , झालं सुद्धा .
गम्मत म्हणजे मुलगा मुलीच्या घरी गेला नव्हता तर मुलगीवाले मुलगा बघायला आलेले .
आणि पोहे मुलीने नव्हे तर मुलाच्या आईने घाबरत घाबरत केले होते .
"
हं ..... मीठ चाललं असतं थोडं " म्हणणारी मुलगी आणि दुसऱ्याच दिवशी शब्दशः 'दत्त' म्हणून उभा राहणार मुलगा .
तब्बल तेहतीस वर्षांपूर्वीची गोष्ट पण खूपदा रिवाइंड करून बघितलेली मजेमजेची गम्मत .
छान मित्र असलेल्या आपल्या नवऱ्याला बऱ्याच गोष्टी सांगायचं मुलगी ठरवते. थँक्यू वगैरे जुळवते सुद्धा , पण आपलंच माणूस आहे म्हणत ते प्रत्यक्ष कधी बोलत नाही .
आयुष्य सोपं असतं छान असतं सहज असतं ..... करायचं म्हंटलं तर . !
आणि गोष्टी छोट्या पण मनावर मोरपीसागत कोरलेल्या .




No comments:

Post a Comment

२ . मोठी न झालेली मोठी मुलं

साधारण चाळीशीची मुलगी आणि तिचा सत्तरीच्या बाबा बँकेत आले . बाबा त्या मुलीला सतत " इथे बस , तिथे सही कर , पलीकडे एंट्री कर , पटकन पैस...