Monday, May 13, 2019

२ . मोठी न झालेली मोठी मुलं


साधारण चाळीशीची मुलगी आणि तिचा सत्तरीच्या बाबा बँकेत आले . बाबा त्या मुलीला सतत " इथे बस , तिथे सही कर , पलीकडे एंट्री कर , पटकन पैसे घे " अशा सूचना देत होता . प्रत्येक गोष्टीबाबत सूचना द्यावी एवढी ती मुलगी लहान नव्हती नक्कीच .
तिच्या चेहऱ्यावर एक ऊदास निरिच्छ भाव लिंपलेला होता आणि तिचा बाबा अस्वस्थ अस्थिर डिस्टर्ब्ड दिसत होता .
वास्तविक दोघे उच्च मध्यम वर्गातले वाटणारे , मुलगी  इंग्रजीत सही करणारी , अर्थातच शिकले सवरलेली होती .
 त्या बापलेकीच्या व्यवहारांमध्ये बोलण्याचा , मध्ये पडण्याचा किंवा सल्ले सूचना देण्याचा मला कोणताच अधिकार नव्हता पण मी विचार करणं तर थांबवू शकत नव्हते .
अशा केसेस समोर आल्यावर मनातला मानसशास्त्र अभ्यासक जागा होतो . ती मुलगी , मुलगी कसली बाईच म्हणावं अशा वयाची ती , गप्प राहून हे टॉर्चर का सहन करत असेल . ती मुळात अशी अशी असेल कि तिच्या आयुष्यात काही प्रसंग घडला असेल , ज्यामुळे तिचा आत्मविश्वास ढळला असेल ? काहीतरी विचित्र घटना घडली असेल आणि आईवडिलांनी मोठ्या प्रयत्नांनी तिला त्यातून सोडवलं असेल म्हणून ती त्यांचा शब्द अव्हेरू शकत नसेल ? लग्न होऊन सासरी गेली असेल आणि काहीतरी अघटित घडून माहेरी परत आली असेल ? एक ना अनेक . किती शक्यता मनात डोकावून गेल्या , अस्वस्थ करून गेल्या .
एकदा वाटलं त्या बाबाला सांगावं , ते जे काही घडून गेलं ते विसरून तिला स्वतःला जगू दे जरा , तिला अशी मानसिक दृष्ट्या पंगू करू नको , जमलं तर तिचा आत्मविश्वास नव्यानं मिळवून दे , तिला तिचं आयुष्य खंबीरपणे जगू दे . किंवा वाटलं तिला सांगावं झडझडून हो नाही म्हण पण बोल काहीतरी .स्वतःच अस्तित्व स्वतःचं मत दाखवून दे कधीतरी .
पण ......हे फक्त मनाचं वाटणं होतं फक्त .आमचं मन वाहतं असलं तरी हात बांधलेले असतात , आमच्या कामाच्या आणि भावनेच्या चौकटी कर्तव्याच्या चौकटीत घट्ट बसवलेल्या असतात त्या चौकटी मोडून बाहेर पडण्याची आम्हाला परवानगी नसते .
 गोष्टी छोट्या दिसतात पण असतात अस्वस्थ करणाऱ्या .     


No comments:

Post a Comment

२ . मोठी न झालेली मोठी मुलं

साधारण चाळीशीची मुलगी आणि तिचा सत्तरीच्या बाबा बँकेत आले . बाबा त्या मुलीला सतत " इथे बस , तिथे सही कर , पलीकडे एंट्री कर , पटकन पैस...